मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर युवराज सिंग त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. तसेच युवराज सिंग त्याच्या मजेशीर सोशल मीडिया पोस्टमुळे देखल चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे, पण यावेळी तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. युवराज सिंगला गोव्यात केलेले एक कृत्य महागात पडले आहे. त्यामुळे त्याला नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे.

युवराज सिंगला गोवा पर्यटन विभागाने नोटीस बजावली आहे. युवराजने मोरजिममधील व्हिला नोंदणी न करता ‘होमस्टे’ म्हणून चालवला आहे. या नोटीसमध्ये त्याला 8 डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. गोवा पर्यटन व्यवसाय कायदा 1982 अन्वये, नोंदणीनंतरच राज्यात ‘होमस्टे’ चालवता येईल.

राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी 18 नोव्हेंबर रोजी उत्तर गोव्यातील मोरजिम येथील युवराज सिंगच्या मालकीच्या व्हिला ‘कासा सिंग’ या पत्त्यावर युवराज सिंगला 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नोटीस बजावली. नोटीसमध्ये युवराज सिंगला पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई (एक लाख रुपयांपर्यंत दंड) का सुरू करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे.