नवी दिल्ली : UAE मध्ये 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2022 च्या आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चहरचा संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

चहरच्या जागी वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचा समावेश करण्यात आला आहे, जो यूएईमध्ये टीम इंडियासोबत नेट बॉलर म्हणून उपस्थित आहे. सेन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्वही करतो.

कुलदीपचे प्रशिक्षक एरियल अँथनी यांनी एका वत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, चहर दुखापतीमुळे स्पर्धेतून (आशिया कप) बाहेर पडला असून त्याच्या जागी कुलदीपचा समावेश करण्यात आला आहे.

कुलदीपचा भाऊ जगदीप सेन यांनी सांगितले की, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी 22 ऑगस्टला फोन करून कुलदीपला त्याच्या निवडीबाबत माहिती दिली होती.

चहर फेब्रुवारी २०२२ पासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून तो टीम इंडियात परतला आणि त्याने आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले. कुलदीपला आयपीएल मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सच्या टीमने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्याने ताशी 145 प्रतीतास या वेगाने गोलंदाजी करून खूप प्रभावित केले.