महाअपडेट टीम, 8 फेब्रुवारी 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांचा उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अजितदादा यांनी शाळांना एक आवाहन केलं आहे.
कार्यक्रमातील भाषणावेळी ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांची जवळपास पावणेदोन वर्षे वाया गेली, ती भरून निघाली पाहिजेत. त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला हवा. असं आवाहन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळेंना केलं आहे. तर पुण्यातही शनिवार, रविवारी शाळा सुरु करण्याबाबत शनिवारी बैठकीत निर्णय घेण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्हा परिषदेने राबवलेला स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम अतिशय अभिनंदनीय आहे. त्यामुळे स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा कार्यक्रम राज्यभरात राबवला गेला पाहिजे. त्याचबरोबर तो विभागातही राबवायला हवा अशी अपेक्षाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली.
दरम्यान ऑनलाईन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला पण प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाईनमध्ये येत नाही हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे शाळा ऑफलाईन पध्दतीनेच भरवण्यावरही त्यांनी यावेळी भर दिला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे केलं कौतुक…
संकटावर मात करुन नवीन काहीतरी केले पाहिजे. सोलापूर झेडपी सीईओंनी ते प्रत्यक्षात करुन दाखवले. राज्याला अभिमान वाटेल असे कार्य सोलापूर जिल्हा परिषदेने केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने संकटाचे संधीत रुपांतर केले आहे. राज्य शासनाच्या निधीची वाट न पाहता हा उपक्रम राबवला हे विशेष आहे.
त्याचबरोबर या उपक्रमाचे सातत्य टिकवले पाहिजे, राज्य सरकार आपल्याला योग्य ती मदत देईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. हा उपक्रम पाहून मला आर आर पाटील यांची आठवण येत आहे.
त्यांनी राज्यभरात गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले होते. त्याद्वारे गावंच्या गावे स्वच्छ झाली आणि नागरिकांचे आरोग्यमान उंचावले होते. दरम्यान राज्याने राबविलेले कार्यक्रम देशाने उचलले आणि आज ते केंद्र सरकार राबवत आहे.
12वीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार ऑफलाईन परीक्षेचं हॉल तिकीट :-
राज्यात बारावी परीक्षांसाठी 14,72, 564 विद्यार्थी बसले आहेत. यंदा ‘झिग झॅक’ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा होईल. तर 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 दरम्यान इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल.