नवी दिल्ली : केन विल्यमसनला सनरायझर्स हैदराबादने सोडले आहे. गेल्या वर्षीच, SRH संघाने डेव्हिड वॉर्नरला काढून टाकून IPL 2022 हंगामापूर्वी केन विल्यमसनला पूर्णवेळ कर्णधार बनवले. केन विल्यमसनला 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले असले तरी संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात अपयश आले आणि हंगामाच्या पूर्वार्धात सलग पाच सामने जिंकूनही संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

केन विल्यमसनची कामगिरी अत्यंत खराब होती आणि त्याने 13 डावात 93.50 च्या स्ट्राइक रेटने फक्त 216 धावा केल्या. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्या आयपीएलमधील भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला विचारण्यात आले की गुजरात टायटन्स (GT) किंवा इतर कोणतीही फ्रेंचायझी केन विल्यमसनला लिलावात विकत घेईल का?

या प्रश्नाला उत्तर देताना हार्दिक पांड्या म्हणाला, ‘तो चांगला मित्र आहे. होय त्याला निवडले जाईल. सध्या मी भारताकडून खेळत आहे, याशी संबंधित प्रश्न विचारण्यात यावे, हार्दिकच्या या प्रतिक्रियेनंतर ‘केन विल्यमसनला खरेदी करण्यात गुजरात टायटन्स रस दाखवेल का?’ असा सवाल सर्वत्र आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हार्दिक पांड्याला टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावले होते.