राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजकीय पक्षामार्फत सक्रीय राजकारणात उतरण्याचा मनोदय कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केलेला आहे.

ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांना काँग्रेसमधून ऑफर आलेली असून विचारांचा वारसा लक्षात घेता ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, अशी अटकळ आहे.

हे सुरू असतानाच छत्रपती संभाजीराजे यांनी गुजरातमध्ये जाऊन भाजपच्या एका मोठ्या नेत्याची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू व नीकटवर्तीय मानले जाणारे राज्यसभा खासदार रामभाई मोकरिया यांची संभाजीराजे यांनी भेट घेत चर्चा केली.

साधारणपणे एक तास ही चर्चा सुरु होती. राज्यसभा कार्यकाळ संपण्याच्या दिवशीच ही भेट झाली. संभाजीराजे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, मात्र, त्यांची ही नियुक्ती भाजपच्या कोट्यातून करण्यात आलेली होती.

छत्रपती घराण्यातील व्यक्तीमत्व आपल्याकडे हवे, या उद्देशाने भाजपने त्यावेळी ही नियुक्ती केली होती. आता छत्रपती सक्रीय राजकारणात येण्याच्या तयारीत असताना त्यांना आपल्याच पक्षात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.

त्यामुळे आता छत्रपती काँग्रेसचा पर्याय स्वीकारणार की भाजपमध्ये जाणार की आणखी काही निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.