नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा T20 World Cup 2022 मधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीतही सर्वांच्या नजरा विराटकडे लागल्या आहेत. या मोठ्या सामन्यापूर्वी तो अडचणीत सापडला होता. अॅडलेडच्या रस्त्यावर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली.

सेमीफायनल सामन्यासाठी टीम इंडिया सोमवारी अॅडलेडला पोहोचली होती. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडू आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या कुटुंबीयांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीनंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना विराट कोहलीला चाहत्यांनी घेरले होते, अशा परिस्थितीत विराटच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना मदत करावी लागली. सुरक्षा कर्मचार्‍यांनी विराटची चाहत्यांच्या घोळक्यातून सुटका करून बसमध्ये बसवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत टीम इंडियाच्या खेळाडूंशिवाय त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफचे सदस्यही दिसले. तो सर्व खेळाडूंसोबत टीम बसमध्ये डिनरला गेला होता. विशेष म्हणजे ज्या रेस्टॉरंटमध्ये डिनर-पार्टी आयोजित करण्यात आले होते, त्याचे नाव ‘ब्रिटिश राज’ आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थही मिळतात.

भारत आणि इंग्लंडचे संघ 10 नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हलवर आमनेसामने येतील. हा सामना जिंकणारा संघ १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्याचवेळी, या स्पर्धेतील विराट कोहलीच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, तो 5 सामन्यांमध्ये 123.00 च्या सरासरीने 246 धावा करत सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.