मुंबई : मुंबई रणजी संघाचा क्रिकेटपटू सरफराज खान (Sarfraj khan) याने गुरुवारी मध्य प्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी फायनलमधील आपले शतक त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांना समर्पित केले. पहिल्या डावात शतक झळकावून मुंबईला 374 धावांपर्यंत पोहोचवणाऱ्या सरफराजच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, तो पत्रकारांना म्हणाला, हे शतक माझ्या वडिलांमुळे आहे, ते त्यांच्या त्यागामुळे आहे. नौशाद यांची दोन्ही मुले सरफराज आणि मुशीर मुंबई संघात खेळतात.

रणजीमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सरफराजचे डोळे पाणावले. तो म्हणाला, “आपले जीवन हे लहान स्वप्नांबद्दल आहे जे आपण जपतो. आम्ही (तो आणि त्याचे वडील) एकत्र स्वप्ने पाहतो. मी मुंबईत परतल्यापासून दोन मोसमात 2000 च्या जवळपास धावा केल्या आहेत त्या सर्व माझ्या वडिलांमुळे आहेत.”

कोणताही सामना नसताना दोन्ही भाऊ वडिलांच्या देखरेखीखाली दररोज सहा ते सात तास सराव करतात. काही शिस्तीच्या मुद्द्यांमुळे, सरफराजला एका हंगामासाठी उत्तर प्रदेशला जावे लागले आणि परत येण्यापूर्वी त्याने ‘कूलिंग ऑफ’ वेळ घालवला, त्यानंतर त्याची पुन्हा मुंबई संघात निवड झाली. सरफराज म्हणाला, ‘माझ्यासोबत काय झाले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. वडील नसते तर मी नसतो.

तो म्हणाला, “अनेक समस्या होत्या आणि माझ्या वडिलांनी त्या कशा हाताळल्या याचा विचार करताना मी भावूक होतो. त्यांनी एकदाही माझा हात सोडला नाही. त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकलो.”

सिद्धू मुसेवालाला दिले खास ट्रिब्युट

सरफराज हा पंजाबी गायक सिद्धू मूसवालाचा चाहता आहे ज्याची नुकतीच एका टोळीने गोळ्या घालून हत्या केली होती. शतक झळकावल्यानंतर, सरफराजने मूसवालाच्या शैलीत (मांडी मारून) सेलिब्रेशन केले. याबाबत विचारले असता सरफराज म्हणाला, “हे सिद्धू मुसेवालासाठी होते. मला त्याची गाणी आवडतात आणि मी नेहमी (विकेटकीपर) त्याची गाणी ऐकतो. मागच्या सामन्यातही मी असाच सेलिब्रेशन केले होते पण हॉटस्टारने ते दाखवले नाही. मी ठरवले होते की जेव्हाही मी दुसरे शतक झळकावतो तेव्हा मी असेच सेलिब्रेट करेन.

Leave a comment

Your email address will not be published.