मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. अभिनेत्याला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत त्यांच्या पत्नीने मोठे अपडेट दिले आहेत. पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की, बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. अभिनेत्याच्या विविध अवयवांनी काम करणे बंद केल्याची माहितीही वृषालीने दिली. विक्रम गोखले हे ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत.

वृषालीने सांगितले की, “ते प्रतिसाद देत नाहीत. आम्ही त्यांना स्पर्श करत असतानाही त्यांचे शरीर प्रतिसाद देत नाही. आता पुढे काय करायचे याचा निर्णय गुरुवारी सकाळी डॉक्टर घेतील. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली होती. तिथे गेल्यावर मात्र त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागली. त्यांना हृदय आणि किडनीसारख्या अनेक समस्या आहेत. सध्या त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे.”

शिल्पा शेट्टी आणि अभिमन्यू दासानी यांच्यासोबत ‘निकम्मा’ चित्रपटात विक्रम शेवटचे दिसले होते. हा चित्रपट यावर्षी जूनमध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी अमिताभ बच्चन अभिनीत ‘परवाना’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 40 वर्षांच्या कारकिर्दीत, विक्रम गोखले यांनी विविध मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, ज्यात 1990 मध्ये अमिताभ बच्चन अभिनीत अग्निपथ आणि 1999 मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत हम दिल दे चुके सनम यांचा समावेश आहे.