नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 22 नोव्हेंबर 2022 रोजी एक ट्विट करत गोलंदाज उमरान मलिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर मात्र युजर्सनी ट्विटरवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. उमरान मलिकला टीम इंडियामध्ये संधी न दिल्याने बहुतेक युजर्स नाराज होते. अशा प्रकारे बेंचवर बसून तुम्ही भारताच्या वेगवान गोलंदाजाची नासाडी करणार आहात का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय क्रिकेटमधील सध्याचा सर्वात वेगवान गोलंदाज उमरान मलिक 22 नोव्हेंबर 2022 रोजी 23 वर्षांचा झाला. जम्मूच्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला बीसीसीआय व्यतिरिक्त इरफान पठाण आणि रॉबिन उथप्पा सारख्या काही प्रख्यात माजी भारतीय क्रिकेटपटूंनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बीसीसीआयने ट्विटमध्ये लिहिले की, “टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.’ इरफान पठाणने ट्विटमध्ये लिहिले, ‘युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” रॉबिन उथप्पाने ट्विट केले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा उमरान मलिक, पुढचे वर्ष खूप यशस्वी जावो! तुम्हाला आणखी मोठ्या मंचावर पाहण्यासाठी उत्सुक आहे!!’

यानंतर मात्र नेटकऱ्यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारत ट्रोल केले आहे. उमरान कडे होत असलेल्या दुर्लक्षावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यातील काही प्रश्न पुढील प्रमाणे, एका नेटकऱ्याने ट्विट करत लिहिले, ‘अरे भाऊ, त्याला संघात निवडा, यार.’ दुसऱ्याने लिहिले, ‘याला असच बरबाद करतील, कधीच संधी देणार नाही…जे आशिया कप, वर्ल्ड कप हरल्यानंतर आले, तेच लोक पुढच्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार, ते थर्ड क्लास केएल राहुल, भुवी या लोकांना संधी देतील.”

पुढे एकाने लिहिले, ‘उमरान मलिक आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूंना संधी देत ​​नाही, भुवनेश्वर आणि ऋषभ पंत सारख्या फ्लॉप खेळाडूंना प्राधान्य देत आहे. त्यांना भरपूर संधीही मिळत आहेत.” असे ट्विट करत नेटकऱ्यांनी बीसीसीआयला जाब विचारला आहे.