वीजपुरवठ्याची सर्वाधिक भिस्त असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी जेमतेम २० दिवसांचा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तेथील वीज निर्मितीत अडचणी येणार आहेत.

यामुळे राज्यावरील वीजसंकट गहिरे होत असून, भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला महागड्या दराने खुल्या बाजारातून वीजखरेदी करावी लागणार आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पाचा कंपनीला मोठा आधार आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाची क्षमता १,९५६ मेगावॉट इतकी आहे. पण त्या तुलनेत कंपनी सध्या जेमतेम ५०० ते ६०० मेगावॉट वीजनिर्मिती करू शकत आहे. कोयना जलाशयात जेमतेम असलेला साठा, हे त्याचे प्रमुख कारण आहे.

शनिवार रात्रीपर्यंत कोयना जलाशयात ५.०३ टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यापैकी दररोज किमान ०.२० टीएमसी पाण्याची वीजनिर्मितीसाठी गरज भासत आहे. त्यानुसार सध्या असलेला पाणीसाठा जेमतेम २० दिवस पुरेल इतकाच आहे.

त्यातही वीजनिर्मितीसाठी अधिकाधिक ०.२० टीएमसी पाणी वापरण्याचाच नियम आहे. एकीकडे कोळसाटंचाई असताना, कोयना जलाशयातील जलसाठ्याची स्थितीदेखील संकटातच आहे. त्याचवेळी उरणमध्येही सध्या निम्माच वायुसाठा आहे. यामुळे राज्यावरील वीजसंकट गहिरे होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published.