धावपळीच्या युगात कामाच्या घाईने अनेकांना केसांकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. यामुळे केस गळणे, कोंडा होणे यांसारख्या केसांशी निगडित समस्या वाढू लागतात. विशेषतः केसातील कोंडा यामुळे अनेकजण त्रस्त असतात. यावर अनेकजण बाजारातील महागडी उत्पादने वापरून कोंडा घालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र याचा काहीच फायदा होत नाही.

यासाठी आज आम्ही तुमची कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी काही आयुर्वेदिक व घरगुती उपाय सांगणार आहे. याने तुमच्या केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ केसातील कोंड्यावर फायदशीर ठरणारे आयुर्वेदिक व घरगुती उपाय.

कडुलिंबाची पाने

कडुलिंब हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. केसांच्या समस्येचा सामना करण्यासाठी हजारो वर्षांपासून याचा वापर केला जात आहे. कोंड्याची समस्या असल्यास कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा. नंतर पाने बारीक करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट १० मिनिटे डोक्यावर ठेवा. नंतर पाण्याने डोके धुवा. कडुलिंबाची पाने उकळल्यानंतर उरलेले पाणी साठवा. हे पाणी तुम्ही शाम्पूनंतर डोके धुण्यासाठी वापरू शकता.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे टाळूवर थंड प्रभाव टाकतात आणि खाज कमी करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक अँटीफंगल गुणधर्म असतात. अर्धी वाटी मेथी दाणे घेऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट बनवा आणि केसांना लावा. काही तासांनंतर केस कोमट पाण्याने आणि शाम्पूने धुवा.

दही

जुने आणि आंबट दही किंवा मठ्ठा संपूर्ण टाळूवर लावा. ते किमान १० मिनिटे ठेवा नंतर पाण्याने डोके धुवा. केसांना लावल्यास दही केसांचे पोषण तर करतेच शिवाय केसांना कोंडापासून वाचवण्यासही मदत करते. कोंड्याच्या समस्येचे मुख्य कारण म्हणजे केसांखाली कोरडी त्वचा. दही टाळूचे इतके पोषण करते की कोरड्या त्वचेची समस्या जवळपास दूर होते.

कडुलिंब आणि बेकिंग सोडा

कडुनिंबात अँटीफंगल आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात काही थेंब पाणी टाकून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांना लावा. पेस्ट लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा.
बेकिंग सोडा देखील कोंडा दूर करू शकतो. शाम्पूमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून केस धुवा. हे स्क्रबचे काम करेल आणि स्कॅल्प एक्सफोलिएट करेल. यामुळे डोक्यातील कोंडा टाळता येईल.

रोझमेरी, चहाची पाने आणि लिंबू

दीड कप पाण्यात एक चमचा चहाची पाने उकळा. नंतर एक वाटी उरल्यावर गाळून घ्या. या पाण्यात मेंदी पावडर आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा. किमान १० मिनिटे किंवा संपूर्ण रात्र असेच राहू द्या. ही पेस्ट सकाळी सौम्य शाम्पूने धुवा.

अंडी

कोरड्या केसांमुळे कोंडा होतो आणि केसांचा कोरडेपणा अंड्याने सहज काढता येतो. अंड्यांमुळे केस निरोगी आणि घट्ट होतात. एक अंडे घ्या आणि त्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या. हे अंडे केसांना आणि टाळूला लावा. अर्ध्या तासानंतर केस थंड पाण्याने धुवा आणि नंतर शाम्पू लावा आणि कोमट पाण्याने केस धुवा.

खोबरेल तेल

खोबरेल तेल तुमच्या टाळूला मॉइश्चरायझ करते आणि आवश्यक पोषण पुरवते. हा घरगुती उपाय वापरण्यासाठी तीन ते चार चमचे खोबरेल तेलाने टाळूवर हलक्या हातांनी मसाज करा. आता तेल लावल्यानंतर अर्धा तास कोरडे राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने डोके धुवा.

लसूण आणि कोरफड जेल

आवश्यकतेनुसार लसूण घेऊन ते बारीक करून त्यात थोडे पाणी घालावे. ही पेस्ट टाळूवर लावा. लसणात अँटी फंगल गुणधर्म असतात जे कोंडा दूर करण्यास मदत करतात. याशिवाय कोरफडीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. केस धुण्यापूर्वी, टाळूवर कोरफड जेल लावा आणि थोड्या वेळाने केस शाम्पूने धुवा.

Leave a comment

Your email address will not be published.