महाअपडेट टीम, 27 जानेवारी 2022 : मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मालेगावतातील महापौरांसह काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आज हाती घड्याळ बांधले आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांच्यापाठोपाठ पिता माजी आमदार शेख रशीद, महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.  त्यामुळे मालेगावात काँग्रेस पार्टीला मोठं खिंडार पडलं आहे.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. अजित पवारांनी प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांना सूचना केल्या आहेत ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम होणार नाही, पक्षाला गालबोट लागणार नाही आणि जनतेच्या मनात चुकीची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्व नगरसेवकांनी घ्यावी.

सध्या मालेगावात एकूण 84 जागा आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 30, तर राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने 12 आणि भारतीय जनता पक्षाने 9 जागांवर विजय मिळवला, तर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ला 7 जागा आणि जनता दल सेक्युलरला 7 जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसचे 2 नगरसेवक दिवंगत झाल्यानं उरलेल्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने काँग्रेस पालिकेत शून्यावर पोहचली असुन राष्ट्रवादीच्या महानगरपालिकेत तब्बल 47 जागा झाल्याने स्पष्ट बहुमत मिळालं आहे.तर 13 जागांसह शिवसेनेकडे उपमहापौरपद कायम आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *