रमेश जनार्दन बारहाते यांच्या बंगल्याचे डुब्लूकेट चावीने कुलूप उघडून चोरट्यांनी दागिने रोख रक्कम मिळून दोन लाखांचा ऐवज लांबविला असल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे घडली आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, माळवाडगांव येथे खानापूर रस्त्याचे कडेला बारहाते यांचा बंगला असून घरापासून 3 कि.मी.अंतरावरील शेतात रात्री बारा वाजता लाईट येते म्हणून बारहाते पती-पत्नी मध्यरात्री 12 वाजता घराला बाहेरून कुलूप लावून शेताकडे गेले.
पुढील हॉलमध्ये आई झोपलेल्या, तर एका रूममध्ये मुलगा मुलगी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी कुलूप उघडून आत प्रवेश केला. दरवाजा उघडून कुणीतरी आत आल्याचे वयोवृद्ध आईच्या लक्षात आले.
त्यांना वाटले मुलगा अन् सून कांद्याला पाणी लावून आले असतील. जरा वेळाने आत उचकापाचक करताना खडबड आवाज अन् उघडा दरवाजा पाहून उठून बसल्या.
चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मोठ्या हिमतीने हॉलचा आतील एक दरवाजा बंद करून बाहेर येऊन मुख्य दरवाजाही बाहेरून बंद केला.
हा सर्व प्रकार पाहून आपला कार्यभाग आटोपून तिघे चोरटे जिन्याने वर गेले. गच्चीवरून उड्या मारून पाठीमागील बाजूने पसार झाले.
घटनेची माहिती समजताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून चोरट्यांनी एकूण 1 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.