नागपूर, दि. 21 : जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचा निर्णय आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तालुक्यातील 11 गावातील 8195 हेक्टर जमीन वनखंडात समाविष्ट नसून ती जमीन वनक्षेत्रातून बाहेर असल्याची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे.

हरिसिंग वनसभागृहात यासंदर्भात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनबल प्रमुख वायएलपी राव, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, देवरावजी भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, केशव गिरमा, महेश देवकाते यांच्यासह चंद्रपूर जिल्हा आणि जीवती तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडे असा विनंती अर्ज करण्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तालुक्याचे उपग्रह सर्वेक्षण मॅपिंग करून घेण्याचे आणि ती अद्ययावत माहिती पुढील नियोजनासाठी उपयोगात आणावी, असेही निर्देश श्री.मुनगंटीवार यांनी दिले.  ही सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.