नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना १ जुलै ते ५ जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील गेल्या वर्षी अपूर्ण राहिलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता.

या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे आणि मालिकेवर कब्जा करण्यासाठी त्यांना हा सामना ड्रॉ करायचा आहे. जेव्हा जेव्हा भारत आणि इंग्लंडचे संघ क्रिकेटच्या मैदानावर भेटतात तेव्हा फक्त चेंडू आणि बॅटवची चर्चा होत नाही. तर, किरकोळ तू-तू मैं-मैं आणि मैदानाबाहेरील वाद हे बर्‍याचदा मथळ्यांचा भाग बनतात. या वादांमुळे दोन देशांमधील स्पर्धेची उत्कंठा वाढली आहे.

भारत आणि इंग्लंडमधील 5 मोठे वाद :

  1. कोहलीने-स्टोक्समध्ये रंगला होता वाद

2016 च्या भारत दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत बेन स्टोक्सचा वाद खूप चर्चेत आला आणि हे दोन खेळाडू मैदानाच्या मधोमध एकमेकांशी भिडले. हे प्रकरण 2016 मध्ये विराट आणि स्टोक्स यांच्यातील मोहाली कसोटी सामन्याचे आहे. मोहाली कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 87 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या, पण जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स क्रीजवर पर्वतासारखे उभे होते.

प्रदीर्घ कालावधीनंतर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला यष्टिरक्षक पार्थिव पटेलच्या हाती त्रिफळाचीत केले. बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर टीम इंडिया आणि विराट कोहलीने जल्लोष केला. मात्र यावेळी बेन स्टोक्सला कोहलीची शैली आवडली नाही. बाद झाल्यानंतर स्टोक्सने मागे वळून पाहिलं आणि विराट कोहली संतापेल असं काही बोलला. बेन स्टोक्स मैदानावर थांबला आणि विराट कोहलीला एकटक पाहू लागला. स्टोक्सची वृत्ती पाहून विराटने त्याला काहीतरी सांगितले. मैदानावरील ताण वाढण्यापूर्वीच पंचांनी दोघांना वेगळे केले. यानंतर कोहली पंचांकडे बेन स्टोक्सची तक्रार करताना दिसला.

  1. अँडरसनने जडेजा आणि धोनीसोबत केले गैरवर्तन

2014 मध्ये, टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती, तेव्हा पहिल्या कसोटीत जेम्स अँडरसनची रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीशी टक्कर झाली होती. 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या नॉटिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचसाठी परतत असताना अँडरसन केवळ जडेजाशीच नाही तर कर्णधार धोनी (एमएस धोनी) सोबतही गैरवर्तन दिसला.

आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल थ्री अंतर्गत टीम इंडियाने अँडरसनवर जडेजासोबत गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. तर, इंग्लंड संघानेही जडेजावर खेळ भावनेचा अनादर केल्याचा आरोप केला. मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी जडेजाला लेव्हल 1 अंतर्गत दंड ठोठावला आणि त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के कपात केली. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीही भडकला. त्याविरोधात अपील करण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला.

आश्‍चर्याची बाब म्हणजे हा सगळा वाद सुरू असताना स्टेडियममध्ये सीसीटीव्ही बसवलेले असतानाही या घटनेचे फुटेज ईसीबीकडे नव्हते. ट्रेंटब्रिज येथे खेळाच्या दुसऱ्या दिवशी लंचला जात असताना अँडरसनने पहिला वाद सुरू केला आणि जडेजाला धक्काबुक्की केल्याचा आरोप भारतीय संघाने केला होता. आयसीसीने गॉर्डन लुईस यांची न्यायिक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. सुनावणीनंतर न्यायिक आयुक्तांनी अँडरसन आणि जडेजा यांना क्लीन चिट दिली आणि जडेजाची फी देखील कापली जाणार नसल्याचे सांगितले. या वादाबाबत धोनीने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मॅच रेफरीने जडेजाला काय दंड ठोठावला हे माहित नाही. आम्ही बरोबर होतो, अँडरसनने मर्यादा ओलांडली होती. न्यायाधीशासाठी, पुरावे आवश्यक आहेत. मी त्या विषयावर बोलणार नाही. जे करायला हवे होते ते मी केले. माझ्या संघातील कोणत्याही खेळाडूने मर्यादा ओलांडली तर मी त्याला पाठिंबा देत नाही. हे फक्त गैरवर्तनाबद्दल नव्हते. तर त्याला ढकलले गेले होते.

  1. इयान बेलच्या धावबादवर मोठा वाद

जुलै 2011 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इयान बेल धावबाद झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. नॉटिंगहॅम कसोटीच्या तिसर्‍या दिवशी इयान बेल इऑन मॉर्गनसह क्रीजवर उभा होता. टी ब्रेकपूर्वी शेवटच्या चेंडूवर मॉर्गनने शॉट खेळला आणि त्याच्यासोबत फलंदाजी करणाऱ्या इयान बेलने चौकार मारला. गैरसमजातून इयान बेलने क्रीज सोडली आणि मॉर्गनशी बोलायला सुरुवात केली, पण प्रवीण कुमारने सीमारेषेच्या आधी चेंडू पकडला आणि तो अभिनव मुकुंदच्या दिशेने फेकला. त्यानंतर मुकुंदने त्रिफळा उडवला, त्यानंतर भारतीय संघाच्या आवाहनावर तिसऱ्या पंचाने इयान बेलला रनआऊट दिले आणि हा निर्णय खेळाच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचे समजून प्रेक्षकांनी टीम इंडियाला निशाण्यावर धरले.

चहापानाच्या विश्रांतीदरम्यान इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली आणि इयान बेलच्या रनआउट प्रकरणावर चर्चा केली. यानंतर धोनीने खेळाचा उत्साह पाहता इयान बेलला धावबाद करण्याचे अपील मागे घेतले. चहापानाचा ब्रेक संपल्यानंतर इयान बेलला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाली. पण, आणखी 22 धावा जोडून तो युवराज सिंगच्या हाती आउट झाला आणि 159 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. आयसीसीच्या नियमांनुसार, इयान बेल क्रीजच्या बाहेर होता आणि तिसऱ्या पंचाने त्याला रनआउट दिले. पण, इयान बेल चौकार मारण्याच्या गैरसमजात होता आणि त्यामुळेच तो क्रीझवर परतला नाही. धोनीच्या त्या निर्णयामुळे त्याला 9 वर्षांनंतर 2020 मध्ये दशकातील स्पिरिट ऑफ क्रिकेट ऑफ द डिकेड पुरस्कार मिळाला.

  1. झहीर खानने पीटरसनला दाखवली बॅट

जुलै 2007 मध्ये नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसन यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 198 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने यजमानांवर 266 धावांची आघाडी घेतली होती. लक्ष्मणची विकेट पडल्यानंतर झहीर खान फलंदाजीला आला.

झहीर खान जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्याला काही जेली बीन्स (टॉफी) क्रिझवर पडलेले दिसले, जे त्याने लगेच तेथून काढले. पण, पुढचा चेंडू खेळल्यानंतर त्याला पुन्हा खेळपट्टीवर अनेक जेली बीन्स पडलेले दिसले. यानंतर झहीर खान संतापला आणि त्याने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या केविन पीटरसनला तसे न करण्यास सांगितले, पण आपली चूक मान्य करण्याऐवजी पीटरसन झहीर खानशी भिडला. अशा स्थितीत झहीरने रागाच्या भरात पीटरसनला बॅटही दाखवली. दोघांमधील वाढता ताण पाहता पंचांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार मायकेल वॉनने जेली-बीन्सच्या वादावर माफी मागितली.

  1. सचिनला आऊट करण्याचा नासिरचा प्लॅन

2001 साली जेव्हा इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लिश कर्णधार नासेर हुसैन भारताला पराभूत करण्यासाठी आणि सचिन तेंडुलकरला बाद करण्यासाठी अनेक डावपेचांचा अवलंब करत होता. सचिन तेंडुलकर बाद झाला तर भारताचा पराभव होऊ शकतो हे नासिर हुसेनच्या लक्षात आले.

नासेर हुसेनने योजनेचा एक भाग म्हणून डावखुरा फिरकीपटू ऍशले गिल्सकडे चेंडू दिला आणि सचिन तेंडुलकरला लेग-स्टंपच्या बाहेरच गोलंदाजी करण्यास सांगितले. यामुळे सचिन निराश झाला, कारण तो त्याच्या धावा करू शकला नाही आणि इनसाइड आऊट शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो स्टंपबाद झाला. लेगस्टंपच्या बाहेर सतत गोलंदाजी करण्याच्या इंग्लंडच्या योजनेवर क्रिकेट जगतातील अनेकांनी टीका केली होती.