नवी दिल्ली : आयपीएल 2022 मध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh kartik) पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत टीम इंडियामध्ये शानदार पुनरागमन केले आहे. केवळ दिनेश कार्तिकच नाही तर आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि राहुल त्रिपाठी यांसारख्या काही युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. पण यादरम्यान, असे एक नाव आहे, ज्याचा कोणताही उल्लेख केला जात नाही. ते नाव आहे यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा(Wriddhiman Saha).

IPL 2022 मध्ये रिद्धिमान साहा गुजरात टायटन्सचा भाग होता. या मोसमात त्याचा बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला होता, मात्र मॅथ्यू वेडच्या खराब कामगिरीमुळे त्याच्याकडे सलामीची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर साहाने मागे वळून पाहिले नाही आणि गुजरातसाठी 11 सामन्यात 317 धावा केल्या. आयपीएलनंतर आता पुन्हा एकदा रिद्धीमान साहाने आपली व्यथा सर्वांसमोर मांडली आहे. याचा खुलासा करताना साहा म्हणाला की, यावेळी त्याची भारतीय संघात निवड होणार नाही.

रिद्धिमान साहा म्हणाला, “मला वाटत नाही की माझी निवड होईल कारण मला प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्त्याने आधीच कळवले होते. जर त्यांना मला संघात समाविष्ट करायचे असते तर माझ्या आयपीएल कामगिरीनंतर त्यांनी मला इंग्लंड दौऱ्यासाठी निवडले असते. त्यांच्या निर्णयाने मला सर्व काही स्पष्ट झाले आहे. सध्या फारसे पर्याय नाहीत. पण मी क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जोपर्यंत मला खेळाची आवड आहे तोपर्यंत मी खेळेन.’

यावेळी साहाने त्याच्या आयपीएल कामगिरीबद्दलही सांगितले. स्टार यष्टिरक्षक फलंदाज म्हणाला, “एकंदरीत, मी असे म्हणू इच्छितो की मी योगदान दिले आणि आम्ही चॅम्पियन बनलो. यापूर्वी 2014 मध्ये मी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून फायनलमध्ये शतक झळकावले होते. रँकिंगनुसार तुम्ही म्हणू शकता की हे माझे सर्वोत्कृष्ट आयपीएल होते, परंतु धावांच्या दृष्टीने मी २०१४ मध्ये अधिक धावा केल्या.”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की रिद्धिमान साहा सध्या भारतीय संघाचा भाग नसला तरी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव त्याला सध्याचा सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षक मानतो. सध्या संघात ऋषभ पंत, केएल राहुल, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन आणि इशान किशनसारखे यष्टिरक्षक फलंदाज आहेत.