नवी दिल्ली : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या अंध विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाला अद्याप व्हिसा न मिळाल्याने आयोजकांमध्ये नाराजी आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) 5 ते 17 डिसेंबर दरम्यान तिसऱ्या अंध टी-20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ सहभागी होणार आहेत.

या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांना 4 डिसेंबरपर्यंत येथे पोहोचायचे आहे, परंतु पाकिस्तानी संघाला परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडून अद्याप परवानगी आणि व्हिसा मिळालेला नाही. तथापि, आयोजकांनी परराष्ट्र व्यवहार आणि गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आहे, तर पाकिस्तान देखील आपल्या स्तरावर व्हिसा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ही स्पर्धा व्हायला फारसा वेळ उरलेला नाही, अशा परिस्थितीत पाकिस्तानला आतापर्यंत व्हिसा न मिळाल्याने आयोजकांसाठी अडचणीचे ठरले आहे.

आयोजकांच्या मनात प्रश्न आहे की जर पाकिस्तानला व्हिसा मिळाला नाही तर ही जागतिक स्पर्धा कशी होणार? भारताने 2012 आणि 2017 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते अशा स्थितीती टीम इंडियाचे घरच्या मैदानावर विजेतेपदांच्या हॅट्ट्रिककडे लक्ष असेल. दोन्ही फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून भारताने ही ट्रॉफी जिंकली. यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व किती मजबूत आहे याचा अंदाज लावता येतो. भारत आणि पाकिस्तान संघांमधील द्विपक्षीय मालिका 2012 पासून बंद आहे आणि दोन्ही संघ आता फक्त आयसीसी किंवा मोठ्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खळताना दिसतात.

भारत-पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा

अंध क्रिकेटशिवाय भारत आणि पाकिस्तान संघांमधील स्पर्धाही चुरशीची राहिली असून दोन्ही देशांचे चाहते या सामन्याची वाट पाहत असतात. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या ICC टी-20 विश्वचषक स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. विश्वचषकापूर्वी, यावर्षी यूएईमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले होते, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी एक सामना जिंकला होता.

जय शाहच्या वक्तव्यामुळे वाद :

पाकिस्तानी संघाबाबत वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी 2023 आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केल्यास भारत त्यात सहभागी होणार नाही, असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बराच वाद झाला होता आणि पाकिस्तानने त्यावर तिखट प्रतिक्रियाही दिली होती.