नगर जिल्हा सहकारी बँकेच्या नगरमधील मुख्यालय इमारतीचे तब्बल 52 वर्षांनी फायर ऑडिट होणार आहे. अर्थात, दोन दिवसांपूर्वी बँकेच्या तिसर्या मजल्यावरील लेखापरीक्षण विभागाला लागलेल्या आगीमुळे बँकेच्या सत्ताधार्यांनी तातडीने फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी (दि.1) सायंकाळी सात वाजता बँक इमारतीतील तिसर्या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारी असलेल्या जिल्हा बँकेच्या ऑडिट विभागाला अचानक आग लागून त्यात आतील फर्निचर, कपाटे, कागदपत्रे, फाईल्स, संगणक जळून खाक झाले आहेत.
तासाभराने आग आटोक्यात आली तरीआता या आगीचे नेमके कारण सर्वांच्या उत्सुकतेचे झाले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेत लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे दिसत असले तरी तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.
याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके म्हणाले, ही इमारत 1970 च्या दशकात बांधलेली आहे. बँकेचे उपाध्यक्ष व आम्ही निर्णय घेतला आहे की या इमारतीचे फायर ऑडिट करून घ्यायचे आहे. त्यात काही दोष असतील तर ते आम्ही सुधारून घेऊ. या पुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही याची दक्षता घेऊ, असे ते म्हणाले.
दरम्यान लेखा परीक्षण विभागाची जी काही कागदपत्रे जळाली असतील, त्याच्या प्रती इतर ठिकाणीही साठवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजात काहीअडचणी येणार नाही. शिवाय त्या कागदपत्रांच्या इतर कॉपीही इतर शाखांत असतात. त्यामुळे अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.