नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूचा सलामीवीर नारायण जगदीसनने लिस्ट-ए-क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध २७७ धावांची विश्वविक्रमी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 141 चेंडूंचा सामना करत 25 चौकार आणि 15 षटकार मारले.

एन जगदीशने लिस्ट ए कारकिर्दीतील मागील 268 धावांचा विक्रमही मागे टाकला असून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी अॅलिस्टर ब्राउनच्या नावावर लिस्ट ए कारकिर्दीत 268 धावांचा विश्वविक्रम होता, मात्र आता एन जगदीशनच्या खेळीतून एक नवा विक्रम पाहायला मिळत आहे.

2002 मध्ये चेलटेंहम आणि ग्लोस्टर ट्रॉफीमध्ये सरेकडून खेळताना अॅलिस्टर ब्राउनने 268 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती. यादरम्यान त्याने 160 चेंडूंचा सामना केला, ज्यात 30 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा या विक्रमाच्या अगदी जवळ आला असला तरी. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 264 धावांची तुफानी खेळी केली आणि हा विक्रम 4 धावांनी मोडण्यास तो हुकला. पण आता 20 वर्षांनंतर त्याचा विक्रम भारतीय फलंदाजाने मोडला आहे.

तामिळनाडूचा फलंदाज एन जगदीशन सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटने जोरदार धावा करत आहे. एन जगदीशनला नुकतेच चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आगामी आयपीएलच्या आधी त्याच्या संघातून सोडले आणि त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ज्या प्रकारचा फॉर्म दाखवला त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एन जगदीशननेही या स्पर्धेत सलग पाच शतके झळकावून नवा विक्रम केला आहे.