महाअपडेट टीम,10 फेब्रुवारी 2022:- औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरमधील कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान तालुकाध्यक्ष संजय विठ्ठलराव जाधव यांनी पाच नगरसेवकांसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला फार महत्वाच्या आहेत.आपल्या पक्षाकडे महत्त्वाची खाती असून त्या माध्यमातून आपल्याला विकासात्मक कामे करायची आहेत. औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे असा आत्मविश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रवेशकर्त्यांना दिला.
सर्व जातीधर्माला एकत्र करून काम कसे करायचे हे काम गेली कित्येक वर्षे पवारसाहेब करत आहेत. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे जाणार्या लोकांना संधी पक्ष देत असतो हेही अजित पवार यांनी नमूद केले.अडचणीतून खचून न जाता नव्या उमेदीने पुढे जायचे असते. संकटातून लोकांना बाहेर काढण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आजपर्यंत केले आहे त्यांना बळ देण्याचे काम आपले आहे असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी कॉंग्रेसचे गंगापूर तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर नगरपरिषदेचा गटनेता सुरेश नेमाडे, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, योगेश पाटील, अशोक खाजेकर, मोहसीन चाऊस, माजी नगरसेवक सचिन भवार, अमोल जगताप, राकेश कळसकर, गुलाम शहा, हासिफ बागवान, सय्यद अख्तर, इद्दू खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश भडके, अविनाश सोनवणे, कैलास शेंगुळे, राजेंद्र दंडे, अण्णासाहेब पाठे, प्रविण बाराहाते, रवींद्र सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य शारंधर जाधव, तुकाराम सटाले, माजी युवक तालुकाध्यक्ष उमेश बाराहाते, दिनेश गायकवाड, सोपान देशमुख, सलिम खान, सलीम पटेल, बाबू मनियार आदींचा समावेश आहे.
यावेळी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, आमदार सतीश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संतोष माने आदी मान्यवर उपस्थित होते.