नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशिया चषकात शानदार शतक झळकावून लयीत परतलेल्या विराट कोहलीचे कौतुक करताना म्हटले की, खेळाडू म्हणून या स्टार फलंदाजाकडे त्याच्यापेक्षा जास्त कौशल्य आहे. दोघेही कर्णधार म्हणून क्रिकेटच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जात होते पण गांगुलीच्या मते, कौशल्याच्या बाबतीत कोहली त्याच्यापेक्षा सरस आहे.

सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य

गांगुली एका यूट्यूब शोमध्ये कोहलीबद्दल म्हणाला, ‘मला वाटत नाही की कर्णधारपदाची तुलना केली पाहिजे. तुलना ही खेळाडू म्हणून कौशल्याच्या दृष्टीने व्हायला हवी. मला वाटते की तो माझ्यापेक्षा अधिक कुशल आहे.’ कोहलीला त्याच्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी 1020 दिवस प्रतीक्षा करावी लागली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक महिन्याचा ब्रेक घेतल्यानंतर त्याने आशिया चषकातून संघात पुनरागमन केले आणि गुरुवारी दुबईत अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या.

सौरव गांगुली म्हणाला, ‘आम्ही वेगवेगळ्या टप्प्यात खेळलो आणि भरपूर क्रिकेट खेळलो. मी माझ्या पिढीत खेळलो, आणि तो आता खेळत राहील, कदाचित माझ्यापेक्षा जास्त खेळ खेळत असेल. तो म्हणाला, ‘मी कोहलीपेक्षा जास्त क्रिकेट खेळलो आहे पण या बाबतीत तो मला मागे टाकेल. तो एक अप्रतिम खेळाडू आहे.

गांगुली म्हणाला की क्रिकेट कॅलेंडर खूप व्यस्त झाले आहे आणि कोरोना व्हायरसमुळे बायो-बबल्स सारख्या गोष्टींनी मागील दोन हंगाम खूप कठीण केले आहेत. कोहली संघर्ष करत असताना तुम्ही काही सल्ला दिला होता का असे विचारले असता, गांगुली म्हणाला. ‘तो (विराट कोहली) खूप प्रवास करतो, मला त्याला भेटायला वेळ मिळत नाही.’

प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याशी झालेल्या वादासह आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार पाहणाऱ्या गांगुलीने सांगितले की, क्रिकेटपटूंनीही त्यांची खराब कामगिरी सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे. तो म्हणाला, ‘मी कोणत्याही मानसिक त्रासातून गेलो नाही. माझ्यासाठी चांगले आणि वाईट असे दोन्ही काळ आले आहेत. दडपण न घेता, कमी दाब आणि जास्त दबावाखाली खेळण्याचा मला आनंद मिळाला आहे. मी ते चुकीचे मानत नाही.’