नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात संघाच्या अपयशानंतर बीसीसीआयने काही मोठी पावले उचलली, आणि सध्याच्या निवड समितीला बरखास्त करून यासाठी तत्काळ अर्जही मागवले, ज्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर होती. मात्र आता समोर आलेल्या वृत्तामुळे निवडकर्त्यांची घोडदौड अधिकच रंजक झाल्याचे दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने निवडकर्ता होण्याच्या शर्यतीत उडी घेतली आहे. या पदासाठी आतापर्यंत 60 हून अधिक अर्ज आले आहेत.

बीसीसीआयने दिलेल्या नवीन निवड समितीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर रोजी संपली आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवे निवडकर्ते मिळणार आहेत.

अर्ज केलेल्या यादीमध्ये आत्तापर्यंत, सलील अंकोला, समीर दिघे आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांची नावे समोर आली आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने अर्ज केला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

माहितीनुसार, अजित आगरकरने अर्ज केल्यास तो मुख्य निवडकर्ता होण्याची खात्री जास्त आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, याशिवाय माजी फिरकीपटू मनिंदर सिंग, माजी सलामीवीर शिव सुंदर दास यांच्यासह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी टीम इंडियाच्या वरिष्ठ निवडकर्त्यांच्या पदांसाठी अर्ज केले आहेत.

टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता होण्यासाठी, किमान 7 किंवा अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असावा. उमेदवाराला 30 प्रथम श्रेणी सामने, 10 एकदिवसीय सामने किंवा 20 लिस्ट-ए सामन्यांचा अनुभव असावा. मुख्य निवडकर्ता पदासाठीच्या उमेदवाराने क्रिकेटमधून निवृत्तीची ५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.