नवी दिल्ली : सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत पोहोचण्यासाठी त्याला इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. याच्या एक दिवस आधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दुखापतीबाबत अपडेट दिला होता. अॅडलेडमध्ये सराव सुरू असताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती.

टीम इंडिया चिंतेत होती

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अॅडलेडमध्ये नेट प्रॅक्टिस दरम्यान सराव करत होता. त्यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर बराच वेळ रोहित अराम करत होता. नंतर त्याने पुन्हा मैदानात येऊन सराव केला. मात्र, दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंता नक्कीच वाढली होती.

रोहित शर्माने बुधवारी पत्रकार परिषदेत आपल्या दुखापतीबद्दल सांगितले. रोहितला याबाबत अपडेट विचारले असता, रोहित म्हणाला, ‘काल सरावाच्या वेळी मला चेंडू लागला होता पण सध्या सर्व काही ठीक आहे. होय, दुखापत झाली होती पण मला आता बरे वाटत आहे. यासह रोहित उपांत्य फेरीचा सामना खेळणार हे निश्चित झाले आहे.’

टीम इंडिया अव्वल

भारतीय संघाने सुपर-12 फेरीतील गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळवताना उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडिया समोर आता 10 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये इंग्लंडचे कडवे आव्हान असेल. भारताने सुपर-12 फेरीत फक्त एकच सामना गमावला आणि 4 सामने जिंकले. त्यांचा एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. यासोबतच इंग्लंडने गट 1 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. त्यांनी 5 पैकी 3 सामने जिंकले, एक गमावला आणि अफगाणिस्तानविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला.