नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर एक पराभव आणि दोन राष्ट्रप्रमुख समोरासमोर.होय, सध्याच्या T20 विश्वचषकादरम्यान हे घडले. गुरुवारी ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये पाकिस्तानी संघाचा झिम्बाब्वेविरुद्ध एका धावेने पराभव झाला. या सामन्यानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला ट्रोल केले. त्याला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले.

पर्थच्या मैदानावर गुरुवारी संध्याकाळी T20 विश्वचषकाच्या सामन्यात जे घडले, ज्याची फार कमी लोकांना अपेक्षा होती. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानी संघावर झिम्बाब्वेने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकात 8 गडी गमावून 130 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ 8 विकेटवर 129 धावाच करू शकला. त्यानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियावर पाकिस्तानला पुन्हा ट्रोल केले.

झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन दाम्बुद्जो मनांगाग्वा यांनी एक ट्विट केले आहे. त्यात मिस्टर बीनच्या बहाण्याने त्यांनी पाकिस्तानची खरडपट्टी काढली. त्यांनी लिहिले की, ‘झिम्बाब्वेसाठी किती अप्रतिम विजय आहे. शेवरॉनचे अभिनंदन. पुढच्या वेळी खरा मिस्टर बीन पाठवा .’ वास्तविक, नुकताच झिम्बाब्वेमध्ये फोटो क्लिक करण्याच्या नावाखाली पैसे गोळा करणारा बनावट मिस्टर बीन चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये अनेक बडे लोकही अडकले होते. ती व्यक्ती पाकिस्तानची असल्याचे सांगण्यात आले.

शहबाज शरीफ यांचे प्रतिउत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर दिले. त्यांने लिहिले, ‘आमच्याकडे खरा मिस्टर बीन नसला तरी आमच्यात खरा क्रिकेट स्पिरिट आहे. आम्हा पाकिस्तानी लोकांना पुनरागमन करण्याची विचित्र सवय आहे. अध्यक्ष, अभिनंदन. तुमचा संघ आज खूप छान खेळला.

झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विनने पर्थमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने निर्धारित 20 षटकात 8 बाद 130 धावा केल्या, शॉन विल्यम्स (31) याने सर्वाधिक धावा केल्या. मोहम्मद वसीमने 4 आणि शादाब खानने 3 बळी घेतले. शान मसूदच्या 44 धावांच्या खेळीनंतरही पाकिस्तानी संघ 8 विकेटवर 129 धावाच करू शकला. सामनावीर सिकंदर रझाने 25 धावांत 3 बळी घेतले.