नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत फॉर्ममध्ये असणारे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. यानंतर नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर जातीचा प्रचार करत असल्याचे आरोप केले आहेत. सध्या ट्विटरवर #CastistBCCI हा ट्रेंड सुरु आहे.

आतापर्यंत 40000 हून अधिक लोकांनी या हॅशटॅगवर पोस्ट केले आहेत. बीसीसीआय जातीनुसार संघ जाहीर करते, असा आरोप सर्व चाहते करत आहेत. याशिवाय ऋषभ पंत संघात असल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतला सातत्याने संधी का दिली जात आहे, असे अनेकांचे मत आहे. डावखुरा फलंदाज गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. टी-20 विश्वचषकापासून ते न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपर्यंत पंतला विशेष काही करता आलेले नाही. असे असतानाही बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 23 वर्षीय खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

चाहत्यांच्या मते संजू सॅमसन पंतपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतो. टी-20 क्रिकेटमध्ये पंतने आपल्या खराब फलंदाजीने सर्वांना निराश केले आहे. दुसरीकडे, एकदिवसीय कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत 27 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 36.52 च्या सरासरीने 840 धावा केल्या आहेत. संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 73.50 च्या सरासरीने 294 धावा केल्या आहेत.

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती दिली आहे. पण चाहत्यांचे तर्क काही वेगळेच सांगतात. चाहत्यांना असे वाटते की त्याला खूप उशीरा संधी देण्यात आली होती, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त सामने खेळवले जावेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, सूर्या जुलैपासून सतत क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकापासून ते न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपर्यंत त्याने सातत्याने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.