नवी दिल्ली : भारताचा स्टार खेळाडू केएल राहुल जितका त्याच्या मैदानावरील फलंदाजीमुळे चर्चेत असतो, तितकाच तो मैदानाबाहेर त्याच्या नात्याबद्दल चर्चेत असतो. त्याचवेळी, बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत राहुलच्या लग्नाच्या अफवा सतत येत आहेत. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर खुद्द सुनील शेट्टीने दिले आहे.

सुनील शेट्टी यांना त्यांच्या मुलीच्या आणि केएल राहुलच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी याला अत्यंत बिनधास्तपणे उत्तर दिले आहे. सुनील शेट्टीने या मुलाखतीत लग्नाच्या तारखांबाबत वक्तव्य केले आहे. राहुल आणि अथियाच्या लग्नाबद्दल सुनील शेट्टी म्हणाले, “मुले जितक्या लवकर ठरवतील, कारण आता राहुल खूप व्यस्त आहे, आशिया कप, टी-२० विश्वचषक, ऑस्ट्रेलियासोबतची मालिका त्याला खेळायची आहे. मुलांना वेळ मिळेल तेव्हा लग्न होईल. लग्न विश्रांतीच्या दिवशी होऊ शकत नाही, नाही का?

केएल राहुल आणि अथिया शेट्टी बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांच्या लग्नाच्या अफवा सातत्याने उडत आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जगाला सांगितले आहे, तर सुनील शेट्टीलाही केएल राहुल खूप आवडतो.

आयपीएलनंतर केएल राहुलला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावे लागले होते. केएल राहुल त्याच्या दुखापतीच्या उपचारासाठी जर्मनीला गेला होता, तिथे अथियाही त्याच्यासोबत होती.