नवी दिल्ली : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी, सर्व संघांनी त्यांच्या कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राजस्थान रॉयल्सने 9 खेळाडूंना सोडले आहे, मात्र अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​नाव यामध्ये समाविष्ट नाही. कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी पाहून अश्विनला खूप आनंद झाला आहे.

वास्तविक, एक वेळ अशी होती की, अश्विनला आगामी काळात राजस्थान संघाकडून सोडण्यात येईल, अशी भीती वाटत होती. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या नावाने सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा. खुद्द अश्विननेच याचा खुलासा केला आहे.

रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अश्विन त्याच्याभोवती पसरणाऱ्या अफवांवर बोलताना दिसत आहे. तो म्हणाला, ‘ट्विटर अकाउंटनुसार राजस्थान रॉयल्स मला सोडण्याचा विचार करत होते. याबाबत मला अनेकांनी विचारले. खरं तर, अनेकांनी मला फोन करून सांगितलं आहे की त्यांना माझ्याबद्दल वाईट वाटतं.

अश्विन पुढे म्हणाला, “मलाही खूप वाईट वाटत होतं कारण गेल्या वर्षी मी खूप चांगली कामगिरी केली होती. पण नंतर मला राजस्थान रॉयल्सचा मेल आला. मला टिकवून ठेवण्यात ते आनंदी होते. मग मला समजले की माझ्याबद्दल फक्त अफवा उडत आहेत. पण साहजिकच आम्हाला याबद्दल शंका नव्हती. मला माहित होते की मी राजस्थान रॉयल्सचा एक भाग असेल आणि मला सोडले जाणार नाही.”

गेल्या वर्षी आयपीएलमध्ये अश्विनने 17 सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या होत्या. या दरम्यान, अनुभवी फिरकीपटूने 7.51 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली. गोलंदाजीसोबतच अश्विनने राजस्थान रॉयल्ससाठी फलंदाजीचेही योगदान दिले. त्याने या मोसमात 141.48 च्या स्ट्राइक रेटने एकूण 135 धावा जोडल्या.