नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली नसली तरी, चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक मोठे मोठे कलाकार, चित्रपट समीक्षक यांनी चित्रपटावर कौतुकाचा पुलंच बांधला होता. दरम्यान झुंडच्या या अभूतपूर्व यशानंतर नुकतंच नागपूरकरांनी नागराज मंजुळेंचा सत्कार केला. यावेळी नागराज मंजुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
‘झुंड’ या चित्रपटाचे संपूर्ण शूटींग हे नागपुरात झाले आहे. तसेच या चित्रपटात झळकलेली सर्व मुलेही नागपूरच्या झोपडपट्टीत राहणारी आहेत. यामुळेच नागपुरातील संयुक्त महिला सत्कार समितीच्या वतीने नागराज मंजुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना नागराज मंजुळे म्हणाले, “अनेक महिलांनी मिळून माझा सत्कार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नागपूरकर भगिनींनी हारतुरे देऊन केलेले कौतुक आणि पाठीवर ठेवलेला हात सदैव आठवणीत राहणारा आहे.”
“आयुष्यात आतापर्यंत मला अनेक मानसन्मान मिळाले, सत्कारही खूप झालेत. मात्र, नागपूरकर भगिनींनी माझा केलेला हा सत्कार लई भारी आणि मरेपर्यंत आठवणीत राहणारा आहे”, असेही नागराज मंजुळेंनी सांगितले. यावेळी त्यांनी झुंड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नागपुरात घडलेले किस्से आणि आठवणींनाही उजाळा दिला. तसेच, जर भविष्यात पुन्हा संधी मिळाली, तर मी नागपुरात पुन्हा शूटिंग करेन, असेही नागराज मंजुळेंनी सांगितले.
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला असून अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. तर या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाची कथा फुटबॉलचे प्रसिध्द कोच विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे.