राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी ज्या १०९ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

यामुळे आता त्या १०९ कामगारांची नौकरी धोक्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे कामगार २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. अशी गवाही देखील परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान सिल्वर ओक येथील हल्ल्याप्रकरणी काल दुपारी किल्ला कोर्टात सदावर्ते यांच्यासह यातील ११० आरोपींना हजर करण्यात आले. सदावर्ते यांच्यावर आरोप गंभीर असून त्यांना १४ दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केली.

तसेच मंत्री परब म्हणाले की, राज्यातील सेवा परत सुरू करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. पाच महिने बंद असलेल्या बसगाड्या पूर्ववत करण्यासाठी बस आगारांनी तपासणी केली आहे. २२ तारखेपर्यंत जर संपकरी कामगार कामावर आले नाहीत तर कंत्राटी खासगीकरण करता येईल का, याचा विचार सुरू आहे. एसटी संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *