मुंबई, दि. ८: श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना काळात लंगरच्या माध्यमातून शीख बांधवांनी केलेली मानवसेवा अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

श्री गुरुनानक जयंती निमित्त येथील श्री गुरुसिंग सभेच्या माध्यमातून वडाळा येथे आयोजित केलेल्या गुरूबानी पाठ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, रवींद्र फाटक यांच्यासह श्री गुरुसिंग सभेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, उद्योग आणि विविध सेवा क्षेत्रांच्या वाढीत शीख बांधवांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री गुरुनानकजी यांनी अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा-परंपरांचा कडाडून विरोध केला. सत्य, धार्मिकता आणि करूणेचा मार्ग दाखवून त्यांनी समाजाच्या सेवेसाठी नेहमीच प्रेरणा दिली आहे. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेवुन शीख बांधव नेहमीच समाज सेवेसाठी अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्री गुरूनानकजी यांनी सदैव मानव कल्याणाचा विचार केला. त्यांच्या या विचारांचं प्रकाश पर्व निर्माण व्हावं आणि त्यातून आपल्या सर्वांचं जीवन उजळून निघावं, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्वधर्मीय बांधवांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार श्री. शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास श्री गुरूसिंग सभेचे अध्यक्ष सरदार मनमोहन सिंग रत्ती, उपाध्यक्ष कुलवंत सिंग, रघुवीर सिंग गील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.