महाअपडेट टीम, 11 फेब्रुवारी 2022 : श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आलं आहे. नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीचा तापमान वाढल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटात जवळपास 4 हजार टन मळी वाहून गेली.
या अपघातात आजूबाजूला लोकं नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली झाली नसली तरी तब्बल साडेचार कोटींचे नुकसान झालं आहे. कररखान्यालगत असलेल्या शेतीचेही मोठं नुकसान झालं आहे.
सध्या नागवडे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखाना साखरेबरोबर उपपदार्थ तयार करतो. कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील टाक्यांमध्ये मळी साठविण्यात येते. गुरुवारी पहाटे अर्कशाळेतील टाकीच्या आतील तापमान वाढल्याने टाकीचा स्फोट झाला.
या टाकीची साठवणक्षमता साडेचार हजार टन असून, तीत 4 हजार 100 टन मळी साठविली होती. टाकी फुटल्याने ही मळी वाहून गेली. मात्र, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. टाकीचा झालेला स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत कोसळली. कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले.
कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे, अर्कशाळा विभागप्रमुख बबनराव गोरे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखाना प्रशासनाने उत्पादनशुल्क विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.