‘नॅशनल क्रश’ अशी ओळख असणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आज वाढदिवस आहे. आज रश्मीका 26 वर्षाची झाली आहे. एवढ्या कमी वयात रश्मीकाने स्वतः चे एक वेगळं स्थान निर्माण करत लाखो चाहते मिळवले आहेत.
तिच्या प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्साही पाहायला मिळतात. आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रश्मीकाबद्दल अश्याच काही खास गोष्टी सांगणार आहोत. चला तर मंग पाहूया.
दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कमी वयात लोकप्रिय ठरलेली रश्मिका मुळची कर्नाटकची आहे. 2016 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रश्मिकाची ‘किरिक’ ही डेब्यू फिल्म होती. कन्नड भाषेतील या सिनेमाने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्यावेळी हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड सिनेमा ठरला होता. त्यानंतर रश्मीकाने अनेक चित्रपटात काम केले. अखेर ‘पुष्पा- द राइज’ या सिनेमातील ‘श्रीवल्ली’मुळे ती केवळ दक्षिणेतच नाही, तर देशभरातील घराघरात पोहोचली. या सिनेमानंतर तिच्या करिअरला एक वेगळी झळाळी मिळाली आहे.
26 वर्षांच्या रश्मिकाच्या करिअरचा आलेख चढता असला तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले. किरिक सिनेमाच्या एका पार्टीमध्ये तिची भेट अभिनेता रक्षित शेट्टी याच्याशी झाली होती आणि त्यांनी काही महिन्यातच त्यांच्या नात्याबाबत मोठा निर्णय घेतला. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये साखरपुडा केला. पण हे नात फार काळ टिकलं नाही. नात्यात दुरावा निर्माण झाल्याने 2018 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता रश्मिकाचं नाव विजय देवरकोंडासह जोडलं जात आहे. या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही ऐकायला मिळतात. हे दोघं कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
दरम्यान, रश्मीकाच्या कामाबद्दल बोलायचे असेल तर, रश्मीका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ आणि अमिताभ बच्चनसोबत ‘गुड बाय’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसह ‘अनिमल’ सिनेमातही दिसणार आहे.