नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि भारत (NZ vs IND) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज ऑकलंडमध्ये खेळला जात आहे. यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि शुभमन गिल ही जोडी सलामीवीर म्हणून टीम इंडियासाठी मैदानात उतरली आहे.

या दोन्ही भारतीय फलंदाजांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. लॉकी फर्ग्युसनने शुभमन गिलला 50 धावांवर बाद केले, तर दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या शिखर धवनने आपल्या सर्वोत्तम अर्धशतकाच्या खेळीने मोठा विक्रम नोंदवला आहे.

शिखर धवनने लिस्ट-ए-क्रिकेटमध्ये 12000 धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात शिखर धवनने 72 धावांची शानदार खेळी केली. टीम साऊदीने त्याला बाद करून वनडे क्रिकेटमधील 200वी विकेट मिळवली.

शिखर धवनने 72 धावांच्या खेळीत 77 चेंडूंचा सामना केला, ज्यात 13 चौकारांचा समावेश होता. सुरुवातीला शिखर धवनने सावध फलंदाजी केली पण नंतर त्याच्या डावात जबरदस्त फटके मारले आणि कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक झळकावले.

शिखर धवनच्या आधी या 7 भारतीय फलंदाजांनी 12 हजारांहून अधिक धावा केल्या

टीम इंडियासाठी लिस्ट-ए सामन्यांमध्ये 12 हजार धावा पूर्ण करणारा शिखर धवन आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम युवराज सिंग, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे.

लिस्ट-ए-क्रिकेटमध्ये 22211 धावांचा विक्रम इंग्लंडच्या ग्रॅहम गूचच्या नावावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 21999 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवनने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 297 सामने खेळले असून यादरम्यान त्याने 12025 धावा केल्या आहेत, ज्यात 30 शतके आणि 66 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 248 धावा आहे.