महाअपडेट टीम, 2 फेब्रुवारी 2022 : राज्य सरकारने महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा गुरुवारी (27 जानेवारी) निर्णय घेतल्यानंतर विविध स्तरातून या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे तर विविध स्तरांतून सरकारवर टीका होताना दिसून येत आहे.
या निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बारामती मधील गोविंदबाग पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फारसा महत्वाचा विषय नाही. मात्र जर सर्व स्तरातून विरोध होत असल्याने सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे आपल्याला वाईट वाटण्याचे कारण नाही. असं थेट भाष्य करत पवारांनी निर्णय बदलण्याचे संकेत दिल्याने राज्य सरकार वाईन विक्रीचा निर्णय माघार घेणार का ?अशी चर्चा सुरु झाली आहे.
याशिवाय वाईन आणि दारु यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईन चा खप त्या तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये 18 वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात.
ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही पवार यांनी म्हटले.
अर्थसंकल्पाबाबत केली नाराजी व्यक्त…
मोदी सरकारचा हा सातवा अर्थ संकल्प आहे. अर्थसंकल्प गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा, अधिक हाताला काम देणारा असला पाहिजे. सर्व सामान्य लोकांची हे सरकार हळूहळू कर आखणी कमी करेल,अशी अपेक्षा होती. नोकरी आणि व्यावसाय संदर्भात अपेक्षा जास्त होत्या. पण अर्थसंकल्प पहिल्या नंतर निराशा आली आहे, अशा शब्दात पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.