मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या शाहिद आफ्रिदीची क्रिकेटमध्ये किती उंची आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
आफ्रिदी हा पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पण सध्या हा दिग्गज क्रिकेटर एका नव्या वादामुळे चर्चेत आहे. सहकारी संघातील एका खेळाडूने आफ्रिदीवर मोठे आरोप केले आहेत.
शाहिद आफ्रिदीवर त्याच्या संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने आरोप केले आहेत. कनेरियाने म्हटले आहे की, हिंदू असल्याने आफ्रिदीने पाकिस्तानी क्रिकेट संघात नेहमीच त्याच्याशी वाईट वागणूक दिली. याशिवाय कनेरियाने सांगितले की, आफ्रिदीने त्याला अनेकवेळा धर्म बदलण्यास सांगितले.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कनेरिया म्हणाला, “मी नेहमीच आफ्रिदीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. तो अनेकदा मला धर्म स्वीकारायला सांगायचा, पण मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.”
याशिवाय कनेरियाने असेही सांगितले की, आफ्रिदीशिवाय संघातील कोणताही खेळाडू त्याच्याशी वाईट वागला नाही. पण आफ्रिदी हा संघाचा कर्णधार असल्याने त्याने अनेकदा या खेळाडूला बेंचवर बसवून ठेवले. तो म्हणाला, “कर्णधाराकडे संघाचे पूर्ण नियंत्रण असायचे.
कर्णधार असताना आफ्रिदी मला बेंचवर बसवायचा. मला संघातून काढून टाकायचे. अगदी संपूर्ण हंगाम बाहेर ठेवायचा. मी चांगले काम करत असतानाही माझ्यासोबत असे का होत आहे हे मला समजले नव्हते. जेव्हा मला अ श्रेणीचा केंद्रीय करार मिळाला तेव्हा आफ्रिदीने मला अनेक अपशब्द बोलले. या सगळ्याचा माझ्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला.”
स्पॉट फिक्सिंग बंदीमुळे दानिश कनेरियाला 2013 मध्ये क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. या खेळाडूने पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्याला पुन्हा संधी मिळाली नाही.
याशिवाय कनेरियाने पाकिस्तानचे इतर अनेक खेळाडू फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा आरोपही केला होता, मात्र त्यांना पुन्हा खेळण्याची संधी देण्यात आली. उदाहरणार्थ, तुम्ही मोहम्मद अमीरकडे पाहू शकता.
कनेरिया पुढे म्हणाला, “माझ्यावरील आजीवन बंदी हटवण्यात यावी, ही माझी प्राथमिकता आहे. मी PCB चेअरमन रमीझ रझा यांच्याशी अनेकदा बोललो पण आता 8 महिने झाले आहेत आणि प्रकरण पुढे गेलेले नाही. आयसीसीने मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे, मी पुनरागमन करण्यास तयार आहे. मला पुन्हा मैदानात उतरायचे आहे. असेही कनेरियाने म्हंटले आहे.