नवी दिल्ली : महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लेजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मॅचमध्ये इंग्लंड लिजेंड्सचा 40 धावांनी पराभव केला. देहरादूनमध्ये पावसाचा व्यत्यय, हा सामना 15-15 षटकांचा करण्यात आला. सचिन तेंडुलकरच्या संघाने 15 षटकांत पाच गडी गमावून 170 धावा केल्या. यानंतर इंग्लंड लीजेंड्स संघाला सहा विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या.

सचिन सामनावीर ठरला

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या या 14 व्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने दमदार कामगिरी केली. तुफानी शैलीत खेळत सचिनने 20 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने या खेळीत तीन चौकार आणि तब्बल षटकार मारले. त्याचवेळी युवराज सिंगने 15 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद 31 धावांचे योगदान दिले. इंग्लंड लिजेंड्स संघाकडून स्टीफन पेरीने तीन विकेट घेतल्या. सचिनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

भारतीय संघाची मोठी सुरुवात

देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात केली आणि 5.3 षटकात 65 धावा केल्या. सचिन आणि यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ओझाला पॅरीने बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. सचिन आणि युवीशिवाय युसूफ पठाणनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने 11 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकारांसह 27 धावा केल्या.

सचिनने 7 गोलंदाज आजमावले

सचिन तेंडुलकरच्या टीम इंडिया लीजेंड्सने सात गोलंदाज आजमावले. राजेश पवार, स्टुअर्ट बिन्नी, प्रज्ञान ओझा आणि मनप्रीत गोनी यांना यश मिळाले. पवारांनी तीन षटकांत अवघ्या 12 धावा देत तीन बळी घेतले. बिन्नी, ओझा आणि मनप्रीत गोनी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.