नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादवने धडाकेबाज शतक झळकावले. सूर्यकुमारच्या या शतकी खेळीनंतर रोहित शर्माचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यातून त्याची दूरदृष्टी दिसून येत आहे.

या सामन्यात सूर्यकुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावून भारताला शानदार विजय मिळवून दिला. दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार स्फोटक फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवच्या या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 191/6 अशी मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमारच्या या उत्कृष्ट खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान, रोहित शर्माचे 11 वर्षांचे एक ट्विटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सूर्यकुमार यादवचे कौतुक करत आहे. चाहते रोहितचे हे ट्विट सोशल मीडियावर शेअर करत असून रोहित शर्माच्या दूरदृष्टीचे कौतुक करत आहेत.

डिसेंबर 2011 मध्ये रोहित शर्माने सूर्यकुमार यादवबद्दल ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की, “चेन्नईमध्ये नुकतेच बीसीसीआय अवॉर्ड्स संपले… काही रोमांचक क्रिकेटपटू पुढे येत आहेत… मुंबईतील सूर्यकुमार यादव… भविष्यात त्याच्यावर लक्ष ठेवू!”

अशा परिस्थितीत युजर्स आता ट्विटरवर एक दशक जुनी पोस्ट शेअर करत आहेत, ज्यामध्ये सूर्याला तेव्हा साथ दिल्याबद्दल रोहितचे कौतुक केले जात आहे. सूर्यकुमार यादव सध्या जगातील नंबर 1 टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाज बनला आहे.