नवी दिल्ली : बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यावेळी अडचणीत सापडले आहेत, रॉजर बिन्नी आपल्या एका जवळच्या व्यक्तीमुळेच मोठ्या संकटात सापडले आहे, ही व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांची सून मयंती लँगर आहे. खरे तर हे प्रकरण हितसंबंधाचे आहे.

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना नीतिशास्त्र अधिकारी विनीत सरन यांनी हितसंबंधांच्या संघर्षाची नोटीस बजावली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार बिन्नी यांना 20 डिसेंबरपर्यंत याचे उत्तर देण्यास सांगितले आहे.

तक्रारकर्ते संजीव गुप्ता यांनी आरोप केला आहे की, बिन्नी यांच्यामध्ये हितसंबंधांचा संघर्ष आहे कारण त्यांची सून मयंती लँगर स्टार स्पोर्ट्ससाठी काम करते, आणि त्यांच्याकडेच भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामासाठी मीडिया अधिकार आहेत.

सरन यांनी २१ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्हाला कळवण्यात येते की, तुमच्या हितसंबंधांच्या संघर्षाबाबत बीसीसीआयच्या नियम 38 (1) (A) आणि नियम 38 (2) चे तुम्ही उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांना हे सांगण्यात आले आहे की, 20 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी तक्रारीवर तुमचा लेखी प्रतिसाद सबमिट करण्याचे निर्देश आहेत.”

विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले बिन्नी ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष बनले.त्यांनी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतली. बिन्नी भारतासाठी २७ कसोटी आणि ७२ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

67 वर्षीय रॉजर बिन्नी हा भारताच्या सर्वकालीन अनुभवी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. रॉजर बिन्नीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने कसोटीतील 38 डावांत 47 विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यांच्या 67 डावांत 77 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत 5 अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यातही एक अर्धशतक झळकावले आहे.