एरवी सगळीकडे चोरीच्या घटना आपण रोजच ऐकत असतो मात्र आता सर्वसामान्यांसह बॉलिवूड मधील कलाकार देखील चोरट्यांच्या निशाण्यावर असलेलं एक घटनेतून उघड झाले आहे. अभिनेता अनिल कपूर यांची कन्या तसेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला आहे.
चोरट्यांनी त्यांच्या घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान याबाबत सोनम कपूरच्या सासूने तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुघलक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल असल्याने नवी दिल्ली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत अनेक पथके तयार केली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सोनम कपूरचे सासरे 22 अमृता शेरगिल मार्गावर राहतात.
येथे त्यांची आजी सासू सरला आहुजा (86), मुलगा हरीश आहुजा आणि सून प्रिया आहुजा यांच्यासोबत राहतात. सरला आहुजा यांनी व्यवस्थापक रितेश गौरासोबत 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलिस स्टेशन गाठले.
त्यांनी त्यांच्या खोलीतील अलमिरामधून 1.40 लाख रुपयांचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. त्यांनी 11 फेब्रुवारी रोजी अलमिराची तपासणी केली असता दागिने आणि रोख रक्कम गायब होती.
दरम्यान सोनमच्या घरात जवळपास 25 नोकर आणि 9 केअरटेकर आहेत. सर्वांची चौकशी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही. अशा परिस्थितीत पोलिस फॉरेन्सिक सायन्सची मदत घेण्याचा विचार करत आहेत..