मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आवाज उठवते. यासाठी कधी तिची प्रशंसा होते तर कधी अभिनेत्रीला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकतेच ऋचा चढ्ढा हिने लष्कराबाबत असे ट्विट केले असून तिच्यावर लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्रीवर नाराजी व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

खरं तर, उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, ‘भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश पार पाडण्यासाठी तयार आहे. या विधानाचा हवाला देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘अभद्र ट्विट. ते लवकर मागे घेतले पाहिजे, आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे योग्य नाही.’

2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला होता, ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले. यामुळे सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी अभिनेत्रीची शाळा घेण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले, ‘गलवानमध्ये 20 शूर जवानांनी देशासाठी प्राण दिले पण इथे एक अभिनेत्री भारतीय लष्कराची खिल्ली उडवत आहे’.