मुंबई : कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या 96 धावा आणि स्टार गोलंदाज जोश हेझलवूडच्या 4 विकेट्सच्या जोरावर आरसीबी संघाने मंगळवारी (19 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना 18 धावांनी जिंकला.

या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर आरसीबीच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. पॉवरप्लेदरम्यान 44 धावा होईपर्यंत बंगळुरूच्या संघाला पहिले तीन धक्के बसले. दरम्यान, अनुज रावत (4), विराट कोहली (00) आणि ग्लेन मॅक्सवेल (23) यांनी आपापल्या विकेट्स गमावल्या होत्या.

पॉवरप्लेदरम्यान लखनऊच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना खूप दडपणाखाली आणले, ज्यामुळे 8व्या षटकात प्रभुदेसाईची विकेट पडली. या युवा खेळाडूला केवळ 10 धावा करता आल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार फाफ आणि शाहबाज अहमद यांच्यात भागीदारी झाली आणि दोन्ही खेळाडूंनी मिळून पाचव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने शाहबाज अहमदला (२६) धावबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

या सामन्यात आरसीबीचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकने 13 धावा केल्या. त्याचबरोबर सर्वाधिक धावा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या बॅटने दिल्या. कर्णधार फॅफने 64 चेंडूत 96 धावांची शानदार खेळी केली. लखनऊतर्फे जेसन होल्डर आणि दुष्मंथा चमीराने प्रत्येकी दोन आणि कृणाल पांड्याने एक विकेट घेतली.

182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सलामीची फलंदाजीही संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरली आणि क्विंटन डी कॉक तिसऱ्याच षटकात अवघ्या 3 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. आरसीबीला दुसरे यश मनीष पांडे (06) च्या रूपाने मिळाले. त्यानंतर चांगल्या लयीत फलंदाजी करणाऱ्या कर्णधार केएल राहुलनेही दिनेश कार्तिककडे झेल दिला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.

कर्णधार पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर लखनऊच्या विकेट्स पडत राहिल्या, मात्र यादरम्यान ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने 15 चेंडूत 24 धावा केल्या. मात्र जोश हेझलवूडने त्याला 19व्या षटकात गोलंदाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला. लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमावून 163 धावा केल्या आणि सामना 18 धावांनी गमावला.

Leave a comment

Your email address will not be published.