नवी दिल्ली : कोरोना झाला असल्यामुळे इंग्लंडला न गेलेला रविचंद्रन अश्विन (R. ashwin) येत्या काही दिवसांत इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याला जाण्यास उशीर झाला आहे. लीसेस्टर सराव सामन्यापूर्वी तो इंग्लंडला पोहचू शकतो.

भारतीय संघ १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. गेल्या उन्हाळ्यातील कसोटी मालिकेतील उर्वरित सामना आता होत आहे. टीम इंडियाचे अन्य खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडमध्ये आहेत.

भारतीय संघ १६ जून रोजी इंग्लंडला रवाना झाला, पण त्यावेळी अश्विनला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो संघा सोबत जाऊ शकला नाही. क्रिकबझच्या म्हणण्यानुसार, अश्विनच्या प्रवासासाठी आता व्यवस्था करण्यात येत आहे. लवकरच तो इतर सहकाऱ्यांसोबत संघात असेल.

अश्विन जाऊ शकला नाही तर जयंत यादवला स्टँडबाय ठेवण्यात आले होते. मात्र, आता अश्विन पूर्णपणे बरा असून जयंत यादवच्या पर्यायाची गरज भासणार नाही. कदाचित बुधवारपर्यंत अश्विन यूकेला जाईल. भारतीय संघातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 442 विकेट्स आहेत. या बाबतीत फक्त अनिल कुंबळे त्याच्या पुढे आहे. अश्विनने 86 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

याआधी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतही इंग्लंडला पोहोचले होते. त्याच्यासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेमुळे तिघांनाही विलंब झाला. द्रविड आणि दोन्ही खेळाडू संघात सामील झाले आहेत. भारतीय संघ सध्या सराव सत्रात व्यस्त आहे.

Leave a comment

Your email address will not be published.