नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित वाद अनेकदा समोर येतात. अलीकडेच माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) आरोप केले आहेत. तो म्हणाला होता की, बोर्डाने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाल्यावर एकटे सोडले होते. आता मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून हे सर्व आरोप ‘बकवास’ असल्याचे म्हटले आहे.

शाहिद आफ्रिदीने आरोप केले होते

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या आठवड्याच्या सुरुवातीला पीसीबीवर आरोप केले होते. पीसीबीने स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे दुर्लक्ष केल्याचे त्याने म्हटले होते. शाहीन स्वखर्चाने लंडनमध्ये उपचार घेत आहे. या दाव्यानंतर वसीम अक्रमसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही बोर्डावर निशाणा साधला. आता पीसीबीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर रमीझ राजा यांनी या वादांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रमीज म्हणाला, कधीही एकटे सोडले नाही

पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले, ‘बोर्ड शाहीन आफ्रिदीकडे दुर्लक्ष करू शकेल असे तुम्ही कसे विचार करू शकता? हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. हा दुर्दैवी वाद आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान मोहम्मद रिझवान आजारी पडला, तेव्हा आमच्या डॉक्टरांच्या समितीने तो खेळेल याची खात्री केली. खेळाडू आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. त्याच्या मुक्कामाबाबत किंवा हॉटेलच्या खोलीबाबत काही अडचणी आल्या असतील, पण आम्ही शाहीनला अडचणीच्या वेळी कधीही एकटे सोडले नाही.

या प्रकरणी ते पुढे म्हणाले की, ‘शाहीन आफ्रिदी प्रकरणाबाबत संभ्रमाची स्थिती आहे. मला समजत नाही की आम्ही आमच्या खेळाडूंची काळजी घेत नाही असे कोणी कसे म्हणू शकते. तो (शाहीन) त्याच्या पुनर्वसनासाठी इंग्लंडमध्ये आहे. सर्व काही जसे पाहिजे तसे कार्य करेल. आम्ही आमच्या खेळाडूंना असे कधीही सोडत नाही. हे बकवास आहे. तो (शाहीन) टी-२० विश्वचषकासाठी उपलब्ध असेल.