नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. राहुल त्रिपाठीचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. राहुलने अलीकडेच आयपीएलच्या 15 व्या मोसमात शानदार फलंदाजी केली.

टीम इंडियाला आयर्लंडमध्ये यजमान संघाविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. राहुल त्रिपाठी पहिल्यांदाच संघात निवडल्यामुळे खूप आनंदी आहे. स्वप्न सत्यात उतरल्याचे त्याने म्हंटले आहे.

31 वर्षीय राहुल त्रिपाठी आयपीएलच्या इतिहासात अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एकूण 1798 धावा केल्या आहेत. या यादीत मनन वोहरा दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने १०७३ धावा केल्या आहेत.

मनविंदर बिस्ला ७९८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL 2022 मध्ये, राहुलने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 14 सामन्यात 413 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 158.24 होता.

टीम इंडियाच्या टी-20 संघात सामील झाल्यानंतर राहुल पीटीआयशी बोलताना म्हणाला, ‘माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. मी याचं कौतुक करतो. निवडकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला याचा मला आनंद आहे. माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले आहे. मला खेळण्याची संधी मिळाली तर मी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेन.”

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे

हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हरिभाऊ पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.