नवी दिल्ली : ICC स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागला असून सध्याच्या T20 विश्वचषक 2022 मधून संघ बाहेर पडला आहे. गतवर्षी ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर, यावर्षी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला, परंतु पुढे जाण्यात यश मिळू शकले नाही. संघाच्या पराभवानंतर अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित होत असून या दिग्गजांनी आता छोट्या फॉरमॅटला अलविदा करावा, अशी मागणी होत आहे. त्याच वेळी, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबद्दल लवकरच चर्चा करणार असल्याचे बोलले आहे.

काल भारत आणि इंग्लंड यांच्यात T20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर भारताने हार्दिक पंड्या (63) आणि विराट कोहली (50) यांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून भारतीय संघाने 168 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने अगदी सहज हा टप्पा गाठला. अॅलेक्स हेल्स (86) आणि जोस बटलर (80) यांनी अवघ्या 16 षटकांत 170 धावा करून आपल्या संघाला 10 गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. आता अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, ज्याने यापूर्वी उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता.

भारताच्या दारुण पराभवानंतर पत्रकार परिषदेला आलेले भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की, “सीनियर खेळाडूंच्या भवितव्याबद्दल सांगणे घाईचे आहे. पुढच्या टी-२० विश्वचषकासाठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे.

संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी आयसीसी स्पर्धेत पुन्हा एकदा भारताची निराशा निश्चितच काही खेळाडूंसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. आगामी काळात संघ व्यवस्थापनाचा काय विचार असेल हे पाहावे लागेल.