पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर 54 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. तर चेन्नईचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला.

दरम्यान रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला तिसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या लाजीरवाणाऱ्या पराभवाचं एकमेव कारण यावेळी जडेजाने सामना संपल्यावर सांगितलं आहे.

पंजाबच्या १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची ५ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी जडेजाबरोबर मोइन अलीला भोपळाही फोडता आला नव्हता. पराभवाचे एकमेव कारण सांगताना जडेजा म्हणाला की, ” पहिल्या चेंडूपासूनच आमचे गणित बिघडले आणि त्यानंतर आम्ही सामन्यात पुनरागमन करू शकलो नाही.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आम्ही पहिल्या पॉवर प्लेमध्ये जास्त विकेट्स गमावल्या.” चेन्नईने पहिल्या पॉवर प्लेमध्ये चार विकेट्स गमावल्या होत्या, त्यावेळी ५.३ षटकांमध्ये चेन्नईची ४ बाद २३ अशी दयनीय अवस्था झाली होती आणि तिथेच चेन्नईच्या संघाने अर्ध्यापेक्षा जास्त सामना गमावला होता.

त्यानंतर शिवम दुबेने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. तो संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत असतानाच मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर सर्वांच्या नजरा या महेंद्रसिंग धोनीवर खिळलेल्या होत्या. पण धोनीही चेन्नईला सामना जिंकवून देण्यात अपयशी ठरला.

दरम्यान चेन्नई संघाची कधी गोलंदाजी चांगली होते तर कधी फलंदाजी, पण या दोघांचा योग्य समन्वय मात्र आतापर्यंत दिसलेला नाही आणि हेच त्यांच्या सलग तीन पराभवाचे कारण ठरलेले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *