महाअपडेट टीम, 9 फेब्रुवारी 2022 : नाशिक आणि पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. ज्या रेल्वेमुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांवर येणार आहे, त्या हायस्पीड रेल्वेचे काम आता सुस्साट सुरू झालं आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणा-या पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
या रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे पाटील, व आणि खा. डॉ अमोल कोल्हे यांच्यामधे बैठक दिल्ली येथे संपन्न झाली यावेळी आ. रोहित पवार उपस्थित होते.
पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक हा भाग दळणवळणाच्या दृष्टीने तसेच औद्योगिक वसाहती व शेतकरी बांधवांच्या मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून सदर प्रकल्पाबाबत सहकार्य करून केंद्रीय स्तरावरील अडचणी दूर करण्यासंदर्भात मदत करणार असल्याचे आश्वासन मा. रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले.
या रेल्वेमार्गामुळे पुणे – नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार आहे. पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील 51 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. बहुतेक सर्व गावांमधील जमिन मोजणीचे काम पूर्ण झालं आहे.
या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता 100 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. एकूण दीड हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून, पुण्यासह अहमदनगर आणि नाशिकरांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशीच नाशिककरांची मनोकामना आहे.