नवी दिल्ली : अॅडलेडमध्ये गुरुवारी टीम इंडियासाठी निराशाजनक रात्र होती. इंग्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत संघाला 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर संघाला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. संघाचे दिग्गज माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील संघाच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर टीका केली आहे.

भारतीय क्रिकेटला “वर्कलोड मॅनेजमेंट” च्या पलीकडे जाण्याची गरज आहे, असे भारताचे माजी फलंदाज म्हणाले आहेत, इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना खेळाडूंनी हे विसरून जावे असा आग्रह धरला आहे. जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही तेव्हा तुम्ही वर्कलोडबद्दल बोलता. न्यूझीलंडला जाणाऱ्या संघात बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे कामाचा ताण कसला. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

इंडिया टू डे ग्रुपशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “तुम्ही आयपीएल खेळता, तुम्ही संपूर्ण हंगाम खेळता, तिथे तुम्ही प्रवास करता. फक्त शेवटची आयपीएल 4 केंद्रांवर झाली, बाकी सगळीकडे तुम्ही फिरता. तेव्हा कामाचा ताण नव्हता का? जेव्हा तुम्हाला भारतासाठी खेळायचे असते, तेही जेव्हा तुम्ही नॉन-ग्लॅमरस देशांत जाता तेव्हा तुमच्यावर कामाचा ताण निर्माण होतो? हे चुकीचे आहे.

“खेळाडूंचे अधिक लाड होत आहेत”

सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “वर्कलोड आणि फिटनेस हातात हात घालून जाऊ शकत नाहीत. तुम्ही तंदुरुस्त असाल तर कामाचा ताण पडण्याचा प्रश्नच कुठे येतो? आपण मराठीत म्हणतो की थोडा लाड जास्त जास्त होत आहे, ते थोडं कमी करावं. आम्ही तुम्हाला भरपूर रिटेनर फी देखील देत आहोत. जर तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे खेळत नसाल तर रिटेनर फी देखील सोडा. अशी खरपूस टीका गावस्करांनी यावेळी केली आहे.