नवी दिल्ली : सॅम करनच्या नेतृत्वाखालील शानदार गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करून इंग्लंड दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला.

पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2010 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. दुसरीकडे, पाकिस्तान तिसरा फायनल खेळून दुसऱ्या टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या शोधात होता, पण तो जिंकू शकला नाही.

या स्पर्धेतील पाकिस्तानचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. सुपर-12 मधील पहिले दोन सामने गमावल्यानंतर संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही पाकिस्तानवर टीका करण्यात मागे नव्हता.

पण अंतिम सामन्यातील पराभवानंतर तो नक्कीच निराश झाला असला तरी त्यालाही संघाच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे. संघाला पाठिंबा देताना त्याने आता भारतात विश्वचषक जिंकू असेही म्हटले आहे. पुढील वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे.

शोएब अख्तरने त्याच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही खूप छान काम केले आहे. तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या जवळ होता, पण तरीही अंतिम सामना खेळला. पाकिस्तानच्या गोलंदाजीने संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केली. काही नशीब होते, पाकिस्तान चांगला खेळला आणि तो तिथे येण्यास पात्र होता. शाहीनची दुखापत हा टर्निंग पॉइंट होता, पण ते ठीक आहे. आता इथून आपण स्वतःला खाली पडू द्यायचं नाही.”