दिवसभर फ्रेश व ताजेतवाने राहण्यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा मानला जातो. यामुळे तुमच्या आरोग्याशी निगडित समस्या दूर होण्यास मदत होते. पण हल्ली कामाच्या व्यस्ततेमुळे नाश्ता करणे टाळतो. याचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ शकतात.
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नाश्ता करणे खुप गरजेचे आहे असे डॉक्टरही सांगतात. अन्यथा याने शरीराच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊ नाश्ता न केल्याने त्याचे कोणते विपरीत परिणाम होतात.
पौष्टिक कमतरता
सकाळचा नाश्ता केल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. नाश्ता केल्यानंतर माणूस ६-७ तास काम करतो. त्यासाठी ऊर्जा लागते. जे आपल्याला नाश्ता करून मिळतं. सकाळचा नाश्ता केला नाही तर शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत.
मधुमेह
न्याहारी न केल्याने मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, ज्या महिला न्याहारी करत नाहीत त्यांना टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता २० टक्के जास्त असते.
डोकेदुखीची समस्या
जेवण वगळल्याने साखरेची पातळी कमी होते ज्यामुळे हार्मोन्स बाहेर पडतात जे कमी ग्लुकोज पातळीची भरपाई करू शकतात, दुसरीकडे, यामुळे रक्तदाब पातळी वाढते आणि डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्या निर्माण होतात. डोकेदुखीसारख्या समस्येपासून दूर राहायचे असेल तर रोज नाश्ता करा.
वजन वाढणे
जर तुम्हाला असे वाटत असेल की नाश्ता वगळल्याने वजन कमी होते, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की दररोज नाश्ता केल्याने शरीराचे वजन योग्य राहते. याशिवाय अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक नाश्ता सोडतात ते दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जास्त खातात.
हृदयावर परिणाम
एका अभ्यासानुसार, जे लोक न्याहारी वगळतात त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता २७% जास्त असते. जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. यासोबतच स्ट्रोकसह हृदय व रक्तवाहिन्यांचे आजारही वाढले आहेत.